सासूसह मेव्हण्याला बेदम मारहाण
शिरपूर जैन : बेलखेडा येथे जावायाने सासू व मेहुण्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी (दि.17) रात्री साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेलखेडा येथील रहिवासी नंदा भीमराव इंगोले या आपल्या घरात असताना त्यांचा जावई संतोष सावळे आला. त्याने घराच्या दरवाजाला लाथा मारण्यास सुरुवात केली. तेव्हा नंदा यांनी दरवाजा उघडला. मुलगा संतोष याने त्यास म्हटले, की ‘तू आमच्या दरवाजाला लाथा का मारत आहे. जावयाने शिवीगाळ करत त्याच्या हातातील काठीने व कंबरेचा पट्टा काढून सासू नंदा मेहुण्याला मारहाण केली.
लगेच घरी जाऊन जावयाने सुरा आणला. सुरा मेहुण्याला मारण्यासाठी उगारला असता तो हुकवून सासू नंदा यांच्या डाव्या हाताच्या कोनीवर व उजव्या हाताच्या मनगटावर लागला. तेवढ्यात जावयाचे दोन भाऊ संघपाल सावळे व विशाल सावळे हे दोघे आले. त्यांनी नंदा व त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली.
तसेच तुम्ही जर पोलिस स्टेशनला आमच्या विरुद्ध फिर्याद दिली तर तुम्हाला जिवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. नंदा भीमराव इंगोले (रा. बेलखेडा) यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी जावई संतोष दिनकर सावळे त्याचे दोन भाऊ संघपाल दिनकर सावळे व विशाल दिनकर सावळे (सर्व रा. बेलखेडा) या 3 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.