इन्स्टाग्रामवरील 'जिन्न'च्या नावाखाली फसवणूक! मुंबईच्या तरुणीला १५ लाखांहून अधिक रुपयांचा चुना
आरोपीने सुरुवातीला महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आपल्याकडे ‘जिन्न’ व ‘तांत्रिक शक्ती’ असल्याचे सांगून तिला विविध विधी करण्याचा सल्ला दिला. जिन्न सर्व इच्छा पूर्ण करेल, असे आमिष त्याने दाखवले होते. मात्र, कालांतराने त्याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास विधी अपूर्ण राहील किंवा दुष्ट शक्तींमुळे इजा होईल, अशी धमकी देऊन त्याने अडीच वर्षांत सुमारे १५,९३,९८० रुपये उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. मुंबई सायबर सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावरील अशा फसव्या जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सुरुवातीला, आरोपीने फक्त २५,००० रुपये मागितले. त्यानंतर, तो वेगवेगळ्या बहाण्यांनी पैशांची मागणी करू लागला. कधी विधी अपूर्ण आहे असे सांगून, कधी नकारात्मक ऊर्जा दूर करायची आहे असे सांगून, आणि कधी जिन्न रागावला आहे असे सांगून त्यांनी वारंवार तरुणीकडून पैसे उकळले. त्यानंतरही भीती आणि विश्वास यांच्या कात्रीत सापडलेली ती तरुणी पैसे पाठवत राहिली. तिने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले. या खात्यांमध्ये सुमरा मोहम्मद, मोसिन सलीम आणि गुलनाज यांसारखी नावे वापरली होती.
Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
या फसवणुकीचा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीने तिच्या घरातील सोने विकूनही ते पैसे फसवणूक करणाऱ्यांना दिले होते. जेव्हा अडीच वर्षे पैसे देऊनही काहीच फायदा झाला नाही आणि मागण्या वाढतच गेल्या, तेव्हा तिला संशय आला. अखेरीस, तिने सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर, सायबर सेलने इंस्टाग्राम आयडी, मोबाईल नंबर आणि बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सोशल मीडियाद्वारे लोकांना लक्ष्य करणाऱ्या एका मोठ्या आणि संघटित सायबर फसवणूक टोळीचे हे कृत्य असू शकते, असा पोलिसांना संशय आहे.






