
जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
जावळीतील या छोट्याशा गावात तीन बांग्लादेशी नागरिक येऊन राहतात काय ! ड्रग्स सारखे नशेली पदार्थ बनवतात काय? पण याचा पत्ता कोणाला लागत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन नेमके काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच बाहेरील नागरिक अशा दुर्गम भागात येऊन राहण्यासाठी त्यांना स्थानिक कोणाचातरी आधार, पाठिंबा असल्याशिवाय एवढे धाडस ते करूच शकत नाहीत. मुबंई क्राईम ब्रँच इथून कारवाई करून गेले व त्यांनी जे जाताना मौन राखले मात्र यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटले आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील जावळीचे नाव बदनाम करणारे हे घरभेदी पुढे आणून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.
जावळी हा शांतताप्रिय व राज्यातील दारूमुक्त दुकानांचा तालुका म्हणून ओळखला जातो. बामणोली परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील कोयना जलाशयाचे विहंगम पात्र व सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. परंतु अशा दुर्गम भागाची निवड एमडी ड्रग्जसारखा पदार्थ बनवण्यासाठी केल्याने या भागाच्या नावालाही गालबोट लागले आहे. २५ कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज सापडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असून, जावळीत अशी घटना घडल्याने कोणाच्या आशीर्वादाने हे धागेदोरे इथपर्यंत आले याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक करून मुंबईला नेण्यात आले असले तरी ज्या सावरीत ही घटना घडली तेथील संबंधित जागा मालक, ही जागा त्या परदेशी नागरिकांना दाखविणारा स्थानिक मास्टरमाईंड यांना याची कल्पना नव्हती की त्यांनी जाणून बुजून पैशाच्या हव्यासापोटी या गोष्टींना मुक सहमती देऊन या रॅकेटमध्ये सहभाग घेतला, याचाही छडा लावणे गरजेचे आहे. एकूणच शांतता प्रिय जावलीची ह्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बदनामी झाली असून, यापुढे कायद्याला न जुमानणाऱ्या अशा महाभागांवर प्रशासनाने वचक ठेवून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी समस्त जावळीकरांमधून होत आहे.