
बिडकरांची लागणार पुन्हा सभागृह नेतेपदी वर्णी! महापाैर, स्थायीसह इतर अध्यक्षपदासाठीही चुरस वाढली
महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे एक हाती बहुमत भाजपकडे आहे. यामध्ये बिडकर हे सर्वांत अनुभवी नगरसेवक असुन, ते पाचव्यांदा महापािलकेत दिसणार आहेत. यापुर्वी त्यांनी सभागृह नेतेपद सांभाळले आहे. तसेच शहर सुधारणा समिती आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. त्या अनुभवाच्या जाेरावर त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.
निवडून आलेल्या भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महापालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. या संदर्भातील पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने पुणे महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.
२०१७ साली मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकी भाजपची सत्ता आली. त्यावेळी भापचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना अडीच वर्षे सभागृह नेते पदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना सभागृह नेते पदी एक वर्ष संधी मिळाली. यानंतर महापालिका निवडणुका आणि भविष्यातील महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने घाटे यांच्याकडे सभागृह नेते पद काढून बिडकर यांना पद दिले होते. पुढील दीड वर्षे बिडकर यांनी सभागृह नेते पद सांभाळे. या काळात नदी सुधार प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय यांसारख्या योजनांना मंजुरी मिळाली. नुकतीच पुणे महापालिकेची झालेली निवडणूक बिडकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. त्यामुळे बिडकर यांना पुन्हा संधी दिली.
भाजपमध्ये इतर पदांसाठी हाेणार चुरस !
सत्ताधारी भाजपने बिडकर यांची पक्षाचा गटनेता म्हणून निवड करून सभागृह नेते पदावर त्यांची वर्णी लावली आहे. आता इतर पदांसाठी भाजपमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये महापाैर पदासाठी ज्येष्ठ महीला नगरसेविकांमध्ये चढाअओढ सुरु झाली आहे. तसेच स्थायी समिती ही सर्वांत महत्वाची समिती मानली जाते, या समितीच्या अध्यक्षपदावर भिमाले हे दावा सांगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे भाजपमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा निवडुन आलेल्या नगरसेवकांना न्याय मिळणे गरजेचे आहे. स्थायी समितीखालाेखाल शहर सुधारणा समिती, महिला बाल कल्याण समिती, विधी समिती आदी विषय समिती देखील महत्वाच्या असुन, या समितींवर वर्णी लागावी, तसेच त्या समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी नगरसेवक , नगरसेविकांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.