नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
सावन वैश्य/ नवी मुंबई: हल्ली आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ज्यामध्ये चोरटे सर्वात जास्त लक्ष जेष्ठ नागरिकांना करत आहे. अनेकदा हे चोरटे एसएमएस किंवा ऑनलाईन वेबसाईटद्वारे जेष्ठ नागरिकांना फसवत असतात. आता तर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने सुद्धा नागरिकांची लाखोंची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे, जिथे विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.
कोपरखैरणेतील एका महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. 74 वर्षीय वृद्ध महिलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने फोन करून, सीबीआय चौकशीची तसेच डिजिटल अरेस्टची भीती घालून महिलेची 21 लाखांची फसवणूक केली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
आजवर आपण पोलीस असल्याची बतावणी करून पुढे मर्डर झालाय, नाकाबंदी सुरू आहे, अशा विविध बहाण्याने नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आता राज्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने एका 74 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे.
वनजा श्रीधरन, वय 74 वर्ष, यांना एका अनोळखी नंबर वरून एका इसमाने व्हिडिओ कॉल केला व कमिशनर विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असून, तुम्ही टेरर फंडिंग करणाऱ्या एका इसमाला बँकेत खाते उघडून दिले आहे आणि या बदल्यात तुम्हाला 20 लाख रुपये कमिशन मिळाले आहे. त्यामुळे तुमच्या विरोधात सीबीआय चौकशी सुरू आहे, व तुमचे अरेस्ट वॉरंट निघालं आहे, अशी भीती दाखवली. या सर्व माहिती बाबत वृद्ध महिला वनजा श्रीधरन घाबरून गेल्या.
विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे, श्रीधरन यांनी समोरील व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यावर 20 लाख 280 रुपये ऑनलाईन जमा केले. मात्र काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, श्रीधरन यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.