आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे (संग्रहित फोटो)
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा यांसारखे प्रकार घडत आहेत. असे असताना गोंदियाच्या नवेगावबांध येथे चोरट्यांनी उच्छाद केला होता. गेल्या आठवडाभरापासून घरफोडी, मोबाईल दुकानात चोरी, पानटपरी फोडून चोरी अशा गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
कुणाल तरोणे (रा.नवेगावबांध) यांचे नवेगावबांध येथील बसस्थानकाजवळ गुरुकृपा मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. त्यांच्या दुकानातील अँड्राईड मोबाईल आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्टच्या रात्री चोरून नेले होते. ही बाब ४ ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणाची तक्रार नवेगावबांध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, याप्रकरणात लक्ष घालून पोलिसांनी आश्रमशाळेत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ते विद्यार्थी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील आश्रमशाळेतील आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुप्तहेराकडून खात्रीशीर माहितीच्या आधारे अर्जुनी मोरगाव येथील आश्रमशाळेत शिकत असलेल्या संशयित विधिसंघर्ष बालकांना विचारपूस करण्यात आली. दरम्यान, त्यांनी ३ ऑगस्टला ४ विधिसंघर्ष बालकांनी त्या दुकानातून तसेच ९ ऑगस्टला विधिसंघर्ष बालकांनी गुरुकृपा मोबाईल शॉपीतून मोबाईल व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले मोबाइल व इतर साहित्य आश्रमशाळेतच बॅरेकमध्ये ठेवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हजारोंचा मुद्देमाल जप्त
चोरी केलेले मोबाईल व इतर साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले. त्याची एकूण किंमत ५३ हजार ४०० रुपये असून, सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात केली.