नवी मुंबई/सावन वैश्य : पनवेल परिसरात ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी फसवून अडीच लाख रुपयांची सोन्याची चैन लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान म्हात्रे (वय ६५) हे आपल्या मुलीकडे जाण्यासाठी पायी निघाले असताना त्यांच्याजवळ तीन अनोळखी इसम आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले आणि “मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे” असे म्हटले. त्याचबरोबर परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे सांगून, “गळ्यातील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवा” असा सल्ला दिला.
दरम्यान, एका इसमाने म्हात्रे यांच्याजवळील सोन्याची चैन स्वतःच पिशवीत ठेवली. त्यानंतर म्हात्रे यांनीदेखील आपल्या गळ्यातील गणपतीच्या लॉकेटसह असलेली २ लाख ५० हजार रुपयांची चैन पिशवीत ठेवली. आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून पिशवीतील चैन हुशारीने काढून घेतली व पिशवीला घट्ट गाठ मारून परत दिली. यावेळी पिशवी घरी नेऊनच उघडावी, असे सांगण्यात आले.
म्हात्रे हे घरी आल्यावर पिशवी उघडली असता सोन्याची चैन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिन्ही अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत करत आहेत.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. पोलीस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडे आपले दागिने वा मौल्यवान वस्तू न सोपविण्याची सूचना करण्यात आली आहे.