भाईंदर/विजय काते : शाळेची बस मुलांना सुखरुप नेते असा पालकांचा कायम विश्वास असतो मात्र हाच विश्वास धुळीत जमा झाल्याची घटना भाईंदर परिसरात घडलेली आहे. बेबजाबदारपणाचा कळस घडल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे. मिरा-भाईंदरमध्ये निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या नशेत शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला काशीमीरा वाहतूक विभागाने अटक केली आहे. या बसमध्ये पाच विद्यार्थी प्रवास करत होते. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने भाईंदर (पूर्व) येथील गोल्डन नेस्ट सर्कलजवळील डिव्हायडरवर जोरदार धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक बसताच बसमधील मुलांचा आक्रोश ऐकून परिसरात खळबळ माजली. घाबरलेली मुले मोठ्याने रडू लागली. घटनास्थळी तैनात ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ धाव घेत बस थांबवली. तपासणीदरम्यान चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तत्काळ बस जप्त केली असून चालकावर दंड आकारला आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स देऊन ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजी चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शाळेची बस देखील जर सुरक्षित नसेल तर आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या भरवशावर शाळेत पाठवाय़चं असा सवाल संतप्त पालकांनी व्यक्त केला आहे. या बस चालकाला पोलीसांनी अटक केली असून शाळेची देखील जबाबदारी आहे की शाळेच्या बसमधून मुलं व्यवस्थित शाळेत येत आहेत की नाही, अशी भूमिका देखील पालकांनी घेतलेली आहे.