पुण्यात भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू
पुणे : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश देवीलाल गुजर (वय २८, रा. झांबरे पॅलेसजवळ, महर्षीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुरेश गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मुकेश १९ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुकुंदनगर भागातील रांका हॉस्पिटल परिसरातून निघाला होता. त्यावेळी भरधाव कारने दुचाकीस्वार मुकेश याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कोतकर अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात; तरुणाने लाखो रुपयांना घातला गंडा
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठजवळ टेम्पो पलटी
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले. जखमी भाविकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने इतर वाहनांद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल टाके यांनी दिली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली इंडिका कार थांबली नाही आणि चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
टाटा बसची दुचाकीला जोरदार धडक
मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावर बुधवार (दि. २३) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टाटा बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात बबलू नंदजी गुप्ता (वय ३७, रा. मोशी) यांचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकीवरील मागील आसनावर असलेले सुरेश राजमी कदम (वय ४३, रा. बो-हाडेवाडी, मोशी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.