संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची तक्रारदार महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. नंतर त्याने स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, लायसन्सधारक इथिकल हॅकर असल्याचे भासवून त्याने महिलेसोबत मैत्री वाढवली. काही दिवसांनी त्याने महिलेला लग्नासाठी विचारणा केली. ओळखीतून त्याने वेळोवेळी आपल्या हृदय शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी, बहिणीच्या प्रसूतीसाठी आणि अन्य वैयक्तिक कारणांसाठी महिलेकडून ऑनलाइन, धनादेशद्वारे आणि रोख स्वरूपात मिळून चार लाख रुपये घेतले.
याशिवाय, महिलेकडील सोन्याचे दागिने, एक सोनसाखळी आणि दोन अंगठ्या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीत गहाण ठेवून त्यावर ८० हजार रुपयांचे कर्ज काढले आणि ते स्वतःसाठी खर्च केले. अशा प्रकारे एकूण मिळून त्याने महिलेची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वानवडी पोलिस याचा तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : भरदुपारी दोघांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले; आरडाओरडा केला, पण…
मुकादमाने केली ऊस वाहतूकदाराची फसवणूक
ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून मुकादमाने ऊस वाहतूकदाराकडून ७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊस वाहतूकदार रामचंद्र सीताराम चव्हाण (रा. चोभे पिंपरी, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत उसतोड मुकादम संजय मानसाराम निकम (रा. खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.