खटाव तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; एकाचा मृत्यू
वडूज : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता खटाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पेडगाव (ता. खटाव) येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत येथील एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुहास राजेंद्र गुजले (वय २७, रा. वडूज) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुहास व अमर अंकुश पाटोळे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पेडगाव येथे सुनील मोरे यांच्या घराजवळ रूपेश संतोष पाटोळे याची रिक्षा पंक्चर झाल्याचे समजल्याने दोघे दुचाकी (एमएच ११ बीक्यू ४३५) वरून गेले होते. त्याठिकाणी त्यांना रिक्षा न दिसल्याने त्यांनी पाटोळे यास रिक्षा कुठे आहे, याबाबत विचारणा केली. त्यावेळी रिक्षा वडूज येथे सुमित मोरे यांच्या घराजवळ असल्याचे समजले. त्यामुळे ते दोघेही सायंकाळी साडे सातच्या सुमारास परत वडूजकडे येऊ लागले असता पेडगावच्या हद्दीत देवदास कुंडलीक मिसळे यांच्या जमिनीजवळ आल्यानंतर वडूजहून पेडगावच्या दिशेने येणारी दुसऱ्या दुचाकीवरुन (एमएच ११ सीटी १५७८) दशरथ नवनाथ जाधव (रा. पेडगाव) हा भरधाव वेगात येत होता.
जाधवच्या दुचाकीने गुजले यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये गुजले हा गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाला. तर पाटोळे व जाधवदेखील जखमी झाले होते. गुजले याला उपचारासाठी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असताना रात्री आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत अमर पाटोळे याने दशरथ जाधव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तपास करत आहेत.