
कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
मृत युवकाचे नाव रोहित मदन कुर्मा (२५, रा. रामनगर, पिंपरी) असे आहे. फिर्यादी अशोककुमार मुनेश्वर सिंग (६०, रा. तापकीरमळ चौक, पिंपरी) हे एका व्यावसायिकाचे वाहन चालक आहेत. त्यांचे वाहनमालक हरीश सिंग आणि आकाश उर्फ बंटी राजपूत (२३, रा. रामनगर, देहूरोड) यांच्यात काही दिवसांपासून पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री आकाश राजपूत आणि त्याच्या साथीदारांनी अशोककुमार यांना मुंढावरे गावाजवळ अडवले, शिवीगाळ करत ‘व्यवहाराचे पैसे दिले नाहीत तर संपवतो’ अशी धमकी देत कारवर कोयते-दांडक्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांना खाली ओढून मारहाण करण्यात आली.
जिवावर आलेली वेळ ओळखून अशोककुमार यांनी स्वसंरक्षणार्थ टोळक्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रोहित कुर्मा यांच्या डोक्यात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अशोककुमार आणि हल्लेखोर गटातील आणखी दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कामशेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील व गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, पाच ते सहा आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून, संपूर्ण घटनेचा तपास कामशेत पोलिसांकडून सुरू आहे.