पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई; चाेरीच्या तब्बल 18 दुचाकी केल्या जप्त
पंढरपूर : पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, पंढरपूर या शहरांतून दोन चोरट्यांनी चोरलेल्या १० लाख ७० हजारांच्या १८ मोटार सायकली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केल्या आहेत. गौरव उमेश गायकवाड (वय ३५, रा. सरगम चौक, पंढरपूर) अहिल्या हॉटेल, मार्केट यार्डसमोर मोटार सायकल पार्किंग करून जेवण पार्सल आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांची मोटारसायकल चोरून नेली. याबाबत त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्ह्यातील संशयित आरोपी लखन शिवराय लोहार (रा. आळंदी रोड, साई कॉम्प्लेक्स, दिघी, पुणे) हा भटुंबरे (ता. पंढरपूर) या गावात आल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानूसार त्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पंढरपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर या शहरांतून १८ मोटार सायकली विनोद बळीराम घुले (रा. कल्पना नगर, कळंब, जि. धाराशीव) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आशिष कांबळे, राजेश गोसावी, शरद कदम, नागनाथ कदम, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हॅबाडे, सिरमा गोडसे, नितीन पलुसकर, सचिन हेंबाडे, नवनाथ माने, शहाजी मंडले, पोहकों समाधान माने, बजरंग बिचकुले, नीलेश कांबळे, रतन जाधव यांनी ही कारवाई केली.