साताऱ्यात ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; पाच आरोपींना ठोकल्या बेड्या
सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय २४, रा. हिलटॉप सोसायटी, शाहूनगर, गोडोली), साईकुमार महादेव बनसोडे (वय २५, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय इंगळे (वय १९, राहणार कोयना सोसायटी सदरबाजार सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २०, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तयब हाफिस खान (वय २३, रा. बांगुर नगर, गोरेगाव, मुंबई) या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईमुळे साताऱ्यातील नशेखोर प्रवृत्ती समोर आल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि त्यांच्या पथकाने केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस अधिकारी आणि पथक यांना नशा करणाऱ्या काही युवकांची गेल्या दोन महिन्यांपासून माहिती मिळाली होती. हे पथक ‘त्या’ युवकावर नजर ठेवून होते. डीबी पथकाने सलग दोन महिने गोपनीय तपास करून सातारा शहराला हे इंजेक्शन पुरवणाऱ्या युवकांची माहिती प्राप्त केली. या युवकाकडून मालाची विक्री केली जात होती.
मुंबईतील युवकाकडून चोरट्या पद्धतीने खरेदी
दिनांक २ मे रोजी चार भिंती परिसरात माल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचण्यात आला. सदरचा युवक चार भिंती परिसरात एका बंद टपरीच्या आडोशाला संशयास्पद रित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या ३० बाटल्या आढळून आल्या. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ही इंजेक्शन मुंबई येथून एका युवकाकडे चोरट्या पद्धतीने खरेदी केल्याची कबूली दिली.
शिकाऊ डॉक्टरसह चार युवकांना अटक
संबंधित युवक त्याच्या विश्वासातील लोकांनाच हा माल पुरवत होता. सप्लाय करणाऱ्या तीन युवकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी एक जण शिकाऊ डॉक्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चारही युवकांना अटक केली आहे. मुंबई येथून ज्या ठिकाणाहून माल सप्लाय होत होता. तेथील युवकाचा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पाठपुरावा करून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत आत्तापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख १५ हजारांचा माल जप्त केला आहे.