महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये; थेऊरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीवर केली कारवाई
पुणे : बेकायदेशिररित्या भारतात येऊन तसेच पुणे जिल्ह्यातील थेऊन परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हारूल पंचानन बिश्वास (53, रा. काकडे बिल्डींग, पहिला मजला, थेऊर, हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. याबाबत दरोडा विरोधी पथकाचे अमोल विठ्ठल पवार यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे.
हारूल बिश्वास याचा बांगलादेश येथे जन्म झाला आहे. १९७२ पासून आजपर्यंत तो बांगलादेशाचा नागरिक आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत कोणताही पुरावा नाही. त्याने भारतात घुसखोरी केली. सुरवातीला तो पश्चिम बंगाल, नंतर देशात विविध ठिकाणी राहीला. सध्या तो थेऊर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तो बांगलादेशाचा नागरिक असतानाही त्याने भारतातील बनावट जन्मप्रमाणपत्र तयार केले. तसेच भारतातील आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणुक आयोगाचे कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड अशी कागदपत्रे स्वत:जवळ बाळगून थेऊन येथे वास्तव्य करत होता. याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : ट्यूशन टीचर की हैवान? शाळकरी मुलीसोबत केले अश्लील कृत्य; नेमके प्रकरण काय?
ठाणे जिल्ह्यात कारवाई
ठाणे जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मानपाडा आणि भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळलेली नाहीत. मानपाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. डोंबिवलीतील एका ठिकाणी सात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून या सात नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर विदेशी नागरिक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या विविध भागात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. खारघर येथील कोपरा येथून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक पुरुष व तीन महिला आहेत. खारघर पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाशीच्या एपीएमसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एक पुरुष व पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.