नवले पुल परिसरात वेश्याव्यवसाय; 'त्या' महिलांवर पोलिसांची कारवाई
पुणे : मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर असलेल्या नवले पूल परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या भागात रस्त्याच्या कडेला उभा राहून या महिला रहदारीस अडथळा तर निर्माण करतातच पण येणाऱ्या-जाणाऱ्यांना हातवारे करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा चार महिलांवर सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई करून गुन्हा नोंदविला आहे.
शहरात स्पा, मसाज सेंटरसोबतच नवले पुल आणि महामार्गावर उभा राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मोठी संख्या वाढत आहे. दोन महिन्यांपुर्वीच परिसरात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर देखील पुन्हा याठिकाणी या महिला उभा राहत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून महिला रस्त्यावर उभ्या राहून बेकायदा वेश्या व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी अनेकदा याविषयी कारवाईची मागणी केली होती. या महिला रस्त्यावर उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करून खुणावत असल्याच्या आणि त्यामुळे या भागातील महिलांना व मुलींना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
हे सुद्धा वाचा : शरद मोहोळच्या टोळीच्या निशाण्यावर कोण? पुण्यातील भाईंचे धाबे दणाणले
नवले पूलाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर महिला उभ्या राहात होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसानी दोन महिन्यापूर्वी येथे कारवाई केली. त्यानंतर काही दिवस हे चित्र बंद झाले होते. मात्र, पोलिसांचे दुर्लक्ष होताच हे प्रकार सुरू झाले. आता पुन्हा एकदा पोलिसांनी याठिकाणी थांबणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आतातरी हे प्रकार थांबणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांकडून तरुणींची सुटका
पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे.