स्वारगेट भागात दिवसाढवळ्या जुगार; पोलिसांनी ६ जणांना पकडले
पुणे : पुणे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असून, स्वारगेट येथील मच्छि मार्केटशेजारी असलेल्या कॅनॉलजवळील रिकाम्या जागेत जूगार खेळताना गुन्हे शाखेच्या यूनिट दोनने छापा कारवाई केली. सहा जणांना पकडून त्यांच्याकडून जूगाराचे साहित्य, रोकड असा ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिरामण धोत्रे (वय ४१), अनंत मुंगारे (वय ६६), योगेश भडकवार (वय २९), राहूल मोरे (वय ३८), सचिन पाटील (वय ३२), विकास रमावत (वय २५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने अनेक भागात जुगार, मटका अड्डे सुरू असल्याचे दिसत आहे. अनेकदा स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष्य करतात. त्यामुळे अशा धंद्यांना अभय मिळत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, स्वारगेट येथील मच्छि मार्केटजवळील मैदानात काहीजण जूगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार गुन्हे शाखा यूनिट दोन तसेच स्वारगेट पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तिथे सहा ते सातजण कल्याण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त
जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्धवस्थ
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना धनकवडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून तब्बल दहा जणांना पकडले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, २२ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जप्त केले आहे. हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असताना सहकारनगर पोलिसांचा त्याकडे कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे.
हे सुद्धा वाचा : भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर होणार कारवाई? शिस्तभंगाची पाठवली नोटीस
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.