गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी : विक्री आणि वाहतूकीसाठी बंदी घातली असतानाही चारचाकीतून सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ व गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. सचिनकुमार आण्णासाहेब बावचे (वय ४८, रा. मुरदुंडे मळा) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी सव्वातीन लाखाच्या चारचाकी वाहनासह २५ हजार ६२४ रुपयांचा गुटखा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी केलेल्या या कारवाईची कुणकुणही कुणाला लागू न दिल्याने या कारवाईबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. संशयित सचिनकुमार बावचे हा कर्नाटकातून अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन गावभाग पोलिसांनी १ ऑक्टोंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता नदीवेस नाका मरगुबाई मंदिर परिसरात कारवाई केली होती. चारचाकीतून (एमएच ०२ डीजी ३३३०) वाहनातून तंबाखूजन्य पदार्थ व विविध कंपन्यांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये सव्वातीन लाखाची गाडी आणि २५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी बावचे याला ताब्यात घेत अटक केली होती. परंतु तब्बल आठवडा लोटला तरी या कारवाई संदर्भात कोणतीच माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती. ती लपविण्यामागे नेमके कारण काय? याची चर्चा शहरात रंगली आहे.
महिलेचाही सहभाग ?
गावभाग पोलिसांनी कारवाई केली, त्यावेळी संशयित सचिनकुमार बावचे याच्यासमवेत एक महिलाही सहभागी होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र पोलिसांनी केवळ बावचेवर गुन्हा दाखल केला आहे. यातील महिलेवर कारवाई न करता गावभाग पोलिसांनी का सोडून देण्यात आले ? याची चौकशी आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी करावी, अशी मागणी होत आहे. यातील महिलेवर कारवाई न झाल्यास न्यायालयात सीसीटिव्ही फुटेज सादर करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले.