संग्रहित फोटो
याप्रकरणात सचिन घायवळ हा स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातून तो निर्दोष सुटला असला, तरी घायवळ टोळीत तो नीलेश घायवळनंतर दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा यासाठी सचिन घायवळ याने अर्ज केला होता. परंतु, त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने पुणे पोलिस आयुक्त यांनी २० जानेवारी २०२५ रोजी अर्ज फेटाळला. नंतर घायवळने गृह खात्याकडे अपील दाखल केले. तेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांचा निर्णय रद्द करून ‘अपील मंजूर करण्यात येत आहे’ असा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांना परवाना देण्यास सांगण्यात आले.
सचिन घायवळने त्याच्या अर्जात म्हटले होते की, ‘मी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगतो. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे,” म्हणून शस्त्र परवाना आवश्यक आहे. गृह विभागाने हे कारण ग्राह्य धरून परवाना मंजूर केला, असे आदेशात दिसून येते.
सचिन घायवळचा मूळ अर्ज आम्ही फेटाळला होता. त्यावर तो अपिलात गेला. त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी घायवळला पिस्तुल परवाना देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, आम्ही अद्याप त्यावर कार्यवाही केलेली नाही. – अमितेशकुमार (पोलिस आयुक्त)






