केअर टेकर महिलेनेच केला हातसाफ, पंढरपूरमधील चाेरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर : राज्यासह देशभरात चोरीचे प्रमाण वाढले असून, पंढरपूर शहरातील एका घरातून सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून चोरलेले सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये सुमारे ८ लाख ८१ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. गुन्ह्यातील महिला ही फिर्यादीच्या राहत्या घरात केअर टेकर म्हणून काम करीत होती. तिने माहिती दिली की या घरामध्ये तोंडाला मास्क बांधून, डोक्यावर कॅप घालून स्पोर्ट दुकाकीवरून आलेल्या व्यक्तीने घरामध्ये घुसून चोरी केली. त्या अनुषंगाने तपास केला. मात्र अशा वर्णनाच्या संशयिताबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्या होत्या. त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. संबधित पथक पंढरपूर शहर व परिसरात तपास करत होते. तपासात फिर्यादीच्या राहत्या घरात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरी केल्याचा संशय बळावला. त्याअनुषंगाने महिलेस विश्वसात घेवून तपास केला असता तिने गुन्हा केल्याची कबुल दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरलेले दागीने व चांदीच्या वस्तू असा एकूण ८ लाख ८० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आशिष कांबळे, पोलिस उपनिरीक्षक राजेश गोसावी, पोलिस हवालदार सिरमा गोडसे, विठ्ठल विभुते, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, कपिल माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, दिपक नवले, धनाजी मुटकुळे, रतन जाधव यांनी ही कारवाई केली.
घरफोड्या करणाऱ्याला चोरट्याला ठोकल्या बेड्या
सिंहगड रोड पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याने घरफोडीतील चोरीच्या पैशांमधून एक कार देखील खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कारसह १४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.