मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : राज्यात ड्ग्जविरोधात पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी कारवाईदेखील केली आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा सहा लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुर्गामाता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खराडी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी काळूबाईनगर परिसरात एक तरुण वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी घेऊन थांबला असून, त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन, प्लास्टिक पिशव्या सापडल्या. धुमाळ मेफेड्रोन कोणाला विकणार होता, तसेच त्याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. धुमाळ एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, राहुल कोळपे, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव यांनी ही कारवाई केली.
नशेसाठी ‘याबा’ गोळ्यांची विक्री
गेल्या काही दिवसाखाली पुणे पोलिसांनी एका परराज्यातील ड्रग्ज तस्काराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘याबा’ गोळ्या जप्त केल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडून ७५. ३६ ग्रॅम वजनाच्या ७ लाख ७४ हजार रुपये किंमतीच्या एकूण ७१८ गोळ्या जप्त केल्या आहेत. निशान हबीब मंडल (वय ४७, रा. बंगळूरू, कर्नाटक) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात मंडल याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक निरीक्षक शितल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे व त्यांच्या पथकाने केली.