पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
पिंपरी : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, गोळीबार, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गेल्या काही महिन्यापासून पुणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसाखाली भावानेच भावावर गोळीबार गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरीतील व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार करून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे याला मालमत्ता विरोधी पथकाने अखेर गजाआड केले आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हेगार घारे हा गँगस्टर रवी पुजारी व सुरेश पुजारी यांच्या गटाशी संबंधित असून, गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक टंचाईत होता. त्याने पिंपरीतील एका व्यावसायिकावर नजर ठेवून सोनसाखळी हिसकावण्याचा कट रचला. मात्र, व्यावसायिकाने प्रतिकार केल्याने घारेने त्यांच्या पायावर गोळी झाडली व घटनास्थळावरून पसार झाला. हेल्मेट व रेनकोट वापरून आपली ओळख लपविल्यामुळे पोलिस तपासात अडचणी आल्या. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत अखेर घारेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीवर २५ गंभीर गुन्हे दाखल असून, त्यात एक हत्या व सहा गोळीबारांचा समावेश आहे. सध्या तो नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत फरार होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार व सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या देखरेखीखाली, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने केली आहे.
भावाने केला भावावर गोळीबार
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.