कॉपर चोरीचा झाला उलगडा, दोघांना ठोकल्या बेड्या; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त
जयसिंगपूर : जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील आर.जी. ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट या दुकानातून २२५ किलो कॉपर धातु व चारचाकी वाहन चोरीप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ८ तासांत तपास करून कर्नाटकातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ३.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक ५ मे २०२५ रोजी रात्री ९ ते ६ मेच्या सकाळी आठच्या दरम्यान चिपरी बेघर वसाहतीतील स्क्रॅप दुकानात ही चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून २२५ किलो कॉपर वॅगनर कारमध्ये भरून पळ काढला होता. फिर्यादी राजू लक्ष्मण गोसावी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
एमआयडीसी परिसरात सापळा रचून पकडले
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच जयसिंगपूर एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित मुकेश गणपती गोसावी (वय ३९) व उमेश गणपती गोसावी (वय ४१, दोघे रा. पिरानवाडी, बेळगाव, कर्नाटक) यांना अटक केली. त्यांच्या वॅगनर कारमध्ये चोरलेला कॉपर मुद्देमाल सापडला. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली, रायगड आदी जिल्ह्यांतील १५ पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई निरीक्षक सत्यवान हाके, अंमलदार ताहीर मुल्ला, अभिजीत भातमारे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते यांनी ही कारवाई केली. पुढील तपास अंमलदार अभिजीत भातमारे करीत आहेत.