इचलकरंजी : केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करुन महानगरपालिकेची अठरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील विश्वजित जयकुमार पाटील (वय ४९, रा. कोरोची) आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद अमृत कांबळे (वय ४१, रा. कामगार चाळ) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. या दोघांनाही न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सन २०२० ते २०२३ या मुदतीत शहरातील महापालिकेच्या पाच शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकसनाचे काम न करता बनावट व बोगस रेकॉर्ड तयार करून शैलेश पोवार या मक्तेदाराची १८ लाख ०५ हजार ५४६ रुपयांची दोन बिले काढत अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी जबाबदार सर्वच खातेप्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. चौकशी अहवालात काम न करता बोगस रेकॉर्ड तयार करुन मक्तेदाराने अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करुन बिल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचे म्हटले होते. तर प्रथमदर्शनी शैलेश पोवार या मक्तेदाराच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने या फसवणुकीत त्याचा थेट सहभाग दिसून आला होता. तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांच्या तक्रारीवरुन पोवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग ?
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविण्यात आला होता. महापालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील व सेवानिवृत्त असलेल्या मुकूंद कांबळे यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात असल्याचे पोलिस उपअधिक्षक पत्की यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात
सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.