सौजन्य - सोशल मिडीया
बीड : बीड शहरातील शिवनेरीनगर परिसरात घराच्या पोर्चमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून ७३ हजार ५५० रुपयांचा सिलेंडर साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी प्रशांत एकनाथ सुपेकर (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. अजय मोहनराव घोडके (वय ३६, रा. शिवनेरीनगर, इमामपूर रोड, बार्शी नाका, बीड) याने स्वतःच्या घराच्या पोर्चमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून ठेवला होता. १४ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर (गवळ गल्ली) परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात इंडेन, भारत गॅस व एचपी गॅस कंपनीचे भरलेले तसेच रिकामे असे अनेक सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची अंदाजे किंमत ७३ हजार ५५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, पुरवठा अधिकारी प्रशांत सुपेकर, पोलीस कर्मचारी नितीन राठोड यांच्यासह पोलीस व पुरवठा विभागाच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारगळ करत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
इंडेन, भारत गॅस व एचपी गॅस कंपनीचे भरलेले व रिकामे सिलेंडर
घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचा अवैध साठा
अंदाजे किंमत : ७३,५५० रुपये
गुन्हा : भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७
गुन्हा क्रमांक : ७८/२०२६ (पेठ बीड पोलीस ठाणे)






