दाबेली स्टॉल धारकाला खंडणीची मागणी, विरोध केल्यानंतर धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दाबेली तसेच समोसा स्टॉल धारकाला गाडा लावण्यासाठी महिन्याला १०० ते २०० रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
लष्कर भागातील पुना कॉलेज समोरील एका पार्किंगमधील दाबेली तसेच समोसा स्टॉल धारकाला पैशांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय स्टॉल धारकाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गण्या नावाच्या एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी सायंकाळी घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लष्कर भागातील पुना कॉलेज समोरील आशियाना सोसयाटीच्या पार्किंगमधील तक्रारदार यांचा दाबेली तसेच समोसा विक्रीचा स्टॉल आहे. नेहमीप्रमाणे ते स्टॉल बंद करून घरी निघाले होते. तेव्हा रात्री दहाच्या सुमारास आरोपी त्यांच्या स्टॉलवर आला. तसेच, त्याने याठिकाणी स्टॉल सुरू ठेवण्यासाठी महिन्याला १०० ते २०० रुपयांची मागणी केली. त्यांनी थोडा विरोध केला असता त्याने तक्रारदारांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच, त्यांच्याकडून जबरदस्तीने २०० रुपये नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास लष्कर पोलिस करत आहेत.
पुण्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला
सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रोड) हिंगणे खुर्द येथील खोराडवस्तीत गुरुवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्यावर राडा घालत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामकिसन गोरोबा टापरे (वय ४९, रा. खोराड वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याचा तरुणावर हल्ला
सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकाजवळच भररस्त्यात गाडीला साईड देण्यावरून वाद घालत कारमधील तिघांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्रानेही सपासप वार केले आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. केवळ साईड देण्यावरून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात भितीदायक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.