पुण्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत; घराच्या दरवाज्याजवळ गेले अन्...
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राठोड, मोरे यांचे वानवडी भागातील सिद्धार्थ काकडे याच्याशी वाद झाले होते. राठोड याच्याविरुद्ध यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. मध्यरात्री राठोड आणि मोरे हे काकडे याचे घर शोधत होते. काकडे याचे घर समजून आरोपींनी तुकाराम कांबळे (वय ५२) यांच्या घराच्या दरवाज्यावर कोयते आपटले. खिडकीच्या काचा फोडून दहशत माजविली. परिसरात गोंधळ घातला.
घटनेनंतर पसार झालेल्या राठोड आणि मोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे करत आहेत.