
कोल्हापूर जिल्ह्यातील एस. एन. गँगला दणका; पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई
इचलकरंजी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एस. एन. गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी, बंदी आदेशाचा भंग, फौजदारी पात्र धाकटदपटशा असे १७ गंभीर व दखलपात्र आणि १ अदखलपात्र असे एकूण १८ गुन्हे या गँगवर दाखल आहेत.
गँगचा म्होरक्या सलमान राजु नदाफ (वय २५ रा. परिट गल्ली गावभाग), अविनाश विजय पडीयार (वय १९ रा. मूळ रा. गोसावी गल्ली सध्या खंडोबावाडी, पडियार वसाहत, यड्राव), अरसलान यासीन सय्यद (वय १९ सध्या रा. सुतारमळा मूळ रा. जवाहरनगर सरनाईक वसाहत), यश संदीप भिसे (वय १९ रा. रामनगर शहापूर), रोहित शंकर आसाल (वय १९ रा. शिंदेमळा, खोतवाडी), अनिकेत विजय पोवार (वय २२ रा. दत्तवाड ता. शिरोळ) यांचा समावेश आहे.
१५ जुलै रोजी गावभाग येथे सलमान नदाफ हा साथीदारांसमवेत फटाके उडवत असताना त्यामधील एक फटाका पूनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३ रा. जैनबस्ती) यांच्याजवळ येऊन पडला. त्यामुळे कुलकर्णी यांनी फटाके लांब जाऊन लावा, असे म्हटल्याच्या कारणावरुन नदाफ याने संगनमत करुन कुलकर्णी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घातला. सर्व आरोपींनी कुलकर्णी यांच्या ब्युटीपार्लरच्या खोलीच्या दरवाजाचे, बोर्डाचे व खिडकीचे आणि शेजारी राहणारे दयानंद लाड यांच्या दुकानाच्या शटरचे व सागर पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाजाचे नुकसान केले. या प्रकरणी पूनम कुलकर्णी यांनी गावभाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
छाननीत संघटित गुन्हेगारी निष्पन्न
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी टोळीच्या संघटित गुन्हेगारीचा आढावा घेत अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना तातडीने संघटित गुन्हेगारीच्या समुळ उच्चाटनासाठी मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानूसार पोलिसांनी प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाच्या छाननीत संघटित गुन्हेगारीचा प्रकार निष्पन्न झाला.
स्थानिक गुन्हे शाखेने केली छाननी
स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छाननी करून प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला. त्यांनी प्रस्तावाच्या कायदेशीर वाबी तपासून प्रस्ताव पूर्वपरवानगीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला. त्यास मंजुरी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.