
गायब झालेले रणदिवे बदलीच्या ठिकाणी रवाना; पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती
पोलीस कर्मचारी गायब होणे ही गंभीर बाब असतानाही यवत पोलीस निरीक्षक देशमुख आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांनी या प्रकरणाचे गांभीर्य न ओळखता केवळ “तपास सुरू आहे” असे सांगत वेळकाढूपणा केल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती आणि या संदर्भात सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत होत्या.
या पार्श्वभूमीवर विविध संविधानप्रेमी नागरिक व संघटनांनी आंदोलन छेडले. हे आंदोलन दडपण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले. मात्र, अखेर रणदिवे स्वतः समोर आल्याने आणि त्यांना यवत येथून सोडण्यात आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
समन्वय साधून निर्णय घ्यावा
रणदिवे हे स्वतःहून पुढे आल्याचे सांगण्यात येत असून ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात केवळ रणदिवे यांनाच दोषी ठरवू नये, तर पोलीस निरीक्षक देशमुख आणि संबंधित वरिष्ठ अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी अनेकदा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात, अशी भावना पोलिस दलात निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात योग्य तो समन्वय साधून निर्णय घ्यावा, अशी मागणी पुरंदर रिपब्लिकन पक्षाचे पंकज धिवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेश डाळिंबे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते विकास कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी
निखिल रणदिवे यांची सुमारे एक वर्षापूर्वी यवत येथून शिक्रापूर येथे बदली झाली होती. मात्र, बदली असूनही त्यांना यवत येथून वेळेवर सोडण्यात आले नव्हते. या काळात त्यांना कथित त्रास व छळ सहन करावा लागल्याने प्रकरण चिघळले. आता रणदिवे यांना यवत येथून सोडण्यात आले असून, त्यांना शिक्रापूर येथे रुजू करून घेऊन प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.