गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टप्रकरणी मोठी अपडेट; 'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार
पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या पासपोर्ट प्रकरणात अहमदपूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ याने २०१९ मध्ये अहमदनगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्याची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल “स्वच्छ” दाखवण्यात आला असा संशय व्यक्त झाला आहे. याप्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने, विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
निलेश घायवळ सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून, त्याच्या टोळीवर पोलिसांनी अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पासपोर्ट प्रकरणात आडनावाच्या नवीन घडामोडी समोर आल्याने त्याला मदत कोणी केली आणि कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली, याकडे लक्ष लागले आहे.
निलेशवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता
निलेश घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याने दुसऱ्या व्यक्तीचे सिम कार्ड घेऊन वापर केला असल्याचे देखील समोर आले असून, त्यासंदंर्भाने देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.