पुणे, कल्याणीनगरः पुण्यातील कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल अपघात प्रकरणात अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अल्पवयीन चालकाची आई शिवानी अगरवाल हिला अटक केली आहे. तिला पहाटे साडे सहा वाजता वडगाव शेरी येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. रात्रीपासून पोलीस तिचा शोध घेत होते. गेल्या काही दिवसांपासून रक्त बदलण्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाच्या आईचा शोध घेण्याची मोहिमेला अखेर यश आले आहे.
कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईचा शोध गेल्या काही दिवसांपासून चालू होता. पहाटे साडे सहा वाजता घरातून तिला घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ससून रूग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात त्याच्या आईचा हात असल्याचा संशय़ व्यक्त करण्यात आला होता.
अपघातप्रकरणात यापूर्वी अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात आहे. तर चालकाचे वडील विशाल व आजोबा सुरेंद्र यांना अटक करण्यात आलेली होती. दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आईचा सहभाग यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले होता. त्यानुसार याप्रकरणी आई शिवानी हिलादेखील अटक करण्यात आली आहे. आज दुपारी शिवानी अगरवाल हिला पोलीस न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.