
स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय
पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला. कोंढवा परिसरातील मॅजिस्टीक बिझनेस बी. जी. लोणकर रोडवरील ‘रिफ्रेश स्पा सेंटर’वर ही कारवाई केली असून, याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली.
स्पा सेंटरचा व्यवस्थापक मोनको लोएम (वय ३६, रा. तळेकर कॉलनी, पिंगळे वस्ती, मुंढवा, पुणे; मूळ रा. ट्युएनसांग, सेंट जॉन स्कूल, नागालँड) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच तेथून तीन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३ तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मसाज पार्लरच्या नावाखाली गुपचूप सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकताच समोर दिसलं असं काही…
ही कारवाई पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलिस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी व त्यांचे पथकाने केली आहे.
खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश
पोलिस अंमलदार अमोल हिरवे यांना बातमीदारामार्फत रिफ्रेश स्पा सेंटरमध्ये महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून अवैध देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांना देण्यात आली. नंतर त्यांनी याची खातरजमा करून कारवाईचे आदेश दिले.
बनावट ग्राहक पाठवला अन्…
पथकाने बनावट ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी व्यवस्थापक महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत होता. त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे.
नाशिकमध्येही सुरु होता प्रकार
दुसऱ्या एका घटनेत, नाशिकमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्याचे समोर आले होते. पीडित मुलींकडून देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या पार्लरवर गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच मुलींची सुटका करण्यात आली.