
बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
शेतातील घरात घुसून केली पती-पत्नीस मारहाण
दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता गणोरवाडी शिवारातील गट क्रमांक ६४ येथे संजय भास्कर पिंगळ हे पत्नीसमवेत शेतघरात असताना सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. बंदूक, चाकू, तलवार आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी पती-पत्नीस मारहाण केली. त्यानंतर घरातील एक लाख ३० हजार रुपये रोख, साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन भार चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील देवमूर्ती आणि मोटारसायकल असा ऐवज लुटून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग
पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके यांच्या सूचनेनुसार तपासाला गती देण्यात आली. दिंडोरीचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी संयुक्त तपास पथके तयार केली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर चार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला.
हे सुद्धा वाचा : फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्…
उत्तर प्रदेशातील तिघांसह स्थानिक आरोपी अटकेत
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनोहर रघुनाथ ब्राम्हणे (वय ३२, गणोरवाडी, हल्ली वळखे, ता. दिंडोरी), गुड्डू ऊर्फ जयकिसन प्रेमपालसिंग (वय ३१), होरीलाल शामसुंदर हकीमसिंग (वय २८) आणि मुकेशकुमार रतनसिंग (वय २९, तिघेही रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींकडून दोन देशी बंदुका, जिवंत काडतुसे, चॉपर आणि गुन्ह्यात लुटलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
Ans: २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता गणोरवाडी शिवारातील संजय पिंगळ यांच्या शेतघरावर सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.
Ans: आरोपींनी एक लाख ३० हजार रुपये रोख, साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन भार चांदीचे दागिने, देवमूर्ती आणि मोटारसायकल असा ऐवज लुटला.
Ans: दिंडोरी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, दोन देशी बंदुका, जिवंत काडतुसे, चॉपर आणि लुटलेली मोटारसायकल जप्त केली आहे. अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.