'...माझ्याकडे ये,' अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून...; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा स्वप्नील लांडे फरार
तक्रारीनुसार, आरोपीने दैवी शक्ती आणि चमत्कारांचा दावा करत लोकांचा विश्वास संपादन केला होता. याच अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने एका अल्पवयीन मुलीला कथितपणे स्वतःच्या मांडीवर बसवले आणि तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा देखावा केला. त्यानंतर, ‘काही अडचण किंवा संकट आले तर माझ्याकडे ये’ असे सांगून मुलीच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला आहे. या प्रकरणात मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आरोपी स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आणि गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला मानसिक आधार मिळावा यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन (कौन्सिलिंग) केले जाते. तसेच आरोपी स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबडेवाडी परिसरातील रहिवासी असून, या घटनेची वाच्यता होताच आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.
सदर प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा भोंदूगिरीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीकडून आणखी किती जणांची फसवणूक किंवा शोषण झाले आहे, याचाही शोध घेतला जात आहे.



