लष्कर पोलिसांची मोठी कारवाई; प्रवाशांना लुटणाऱ्यांना घेतले ताब्यात
पुणे : पुणे शहरात लुटमार तसेच चैन व मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या असताना लष्कर पोलिसांनी रात्रीच्यावेळी प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याकडे सखोल तपास केला जात आहे. याप्रकरणी छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३ रा. बाबाजान चौक, लष्कर) , अमर विशाल खरात (वय १९ रा. साईबाबा मंदिरासमोर, लष्कर), जयेश गणेश भिसे (वय १९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक प्रदीप पवार, पोलीस कर्मचारी संदीप उकिर्डे, रमेश चौधर यांनी केली आहे.
तक्रारदार मुळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. ते काही कामानिमित्त लातूरहून पुण्यात आले होते. लष्कर भागातून ते रविवारी (१५ डिसेंबर) निघाले होते. त्यावेळी तडीपार गुंड छोट्या, त्याचे साथीदार अमर, जयेश यांनी त्यांना अडवले. तसेच विनाकारण वाद घालून त्यांना धमकावले. नंतर त्यांच्याकडील मोबाइल चोरून तिघे पसार झाले. त्यामुळे तक्रारदार प्रचंड घाबरले होते. त्यांनी त्याही अवस्थेत लष्कर पोलीस ठाणे गाठले. तसेच, पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारदारांची अवस्था ओळखली, त्यांना धीर दिला तसेच त्यांच्याकडून चोरट्यांचे वर्णन घेतले. यानंतर पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. आरोपींकडून दोन दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.