
'फटाका' सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल...
पुणे : रात्रीच्या शांततेचा भंग करत फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरच्या बुलेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ अंतर्गत अवघ्या तीन दिवसांत २७४ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ८४ बेकायदा मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा फेरफार करून फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अनेक दुचाकीस्वार कर्णकर्कश हॉर्नचा वापर करत असल्याने नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. एक व्हिडीओ देखील नुकताच व्हायरल झाला होता. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेला कारवाईसंदंर्भात सूचना दिल्या होत्या. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर अशा प्रकारचे बेकायदा सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहनांमध्ये बदल करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच सायलेन्सर जप्त करण्याची कारवाईही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश
‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ची आकडेवारी
कारवाईचा कालावधी : ३ दिवस
कारवाई झालेली वाहने : २७४
वसूल दंड : २.७४ लाख
जप्त मॉडिफाईड सायलेन्सर : ८४
मोहीम : ऑपरेशन मॉडिफिकेशन
“दुचाकींमध्ये बेकायदा फेरफार करू नका. फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर टाळा. वाहतूक नियमांचे पालन करा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.” -डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त (वाहतूक)