पुणे : स्वारगेट बस स्थानकात पोलिसांनी एका गांजा तस्काराला पाठलाग करून थरारकरित्या बेड्या ठोकल्या. त्याच्यानंतर त्याचे दोन साथीदार देखील पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांच्याकडून ६ किलो गांजा, एक इनोव्हा क्रिस्टा कार तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापुर, जि. सोलापूर), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८) व विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक सुर्यकांत सतपाळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, नवनाथ शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
पुणे शहरात अमली पदार्थ तस्करांवर नजर ठेवली जात असतानाच गांजा तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. यामुळे पोलिसांकडून परराज्यातील व शहरातील तस्कारांचा माग काढला जात आहे. यादरम्यान, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रांत सावंत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती स्वारगेट बस स्थानकात उभा असून, तो वेळापुर बसची वाट पाहत आहे. परंतु, त्याच्याकडे असलेल्या बॅगेत गांजा आहे. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला. परंतु, पोलिसांचा संशय येताच त्याने बॅग खाली टाकून तेथून पळ काढला. तेव्हा पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. या बॅगेची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला. दरम्यान बस स्थानकात सायंकाळच्या वेळी गर्दी होती. तेव्हाच हा प्रकार घडल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.
पोलिसांकडून तांत्रिक तपास
चौकशीत त्याचे साथीदार अल्ताफ व विठ्ठल यांनी त्याला गांजा दिल्याचे समोर आले. लागलीच पथकाने या दोघांचा तांत्रिक तपास केला. तेव्हा पंढरपूरमधील वेळापुर भागात दोघे असल्याचे समजले. पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, असता इनोव्हा क्रिस्टा या गाडीत ६ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह गाडी जप्त केली. पुढील तपास स्वारगेट विभागाचे विशेष पथक करत आहे.