आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी गुजरातमधून ४ जणांना केली अटक
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. काही साथीदार पळून गेले होते. अशातच आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत पकडलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आधी 8 जणांना बेड्या ठोकल्याआहेत. यामध्ये आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय 64), तुषार वाडेकर (वय 24), स्वराज वाडेकर (वय 21), वृंदावनी वाडेकर (वय 40), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय 22, सर्व राहणार नानापेठ), सुजल मेरगू (वय 23) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली होती. तर अमित पाटोळे (वय 19), यश पाटील (वय 19) या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं होतं. अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत आयुषचा मृत्यू झाला होता.
आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं?
आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकरवर जवळपास 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी अमन पठाणने जवळपास 8 गोळ्या झाडल्या होत्या. आयुषची हत्या करून तेथून निघाल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. अर्णवने याविषयी सांगताना म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’
सोनाली आंदेकरला देखील अटक करा, आयुषच्या आईची मागणी
मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा माझ्या लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना… पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकरच्याच घरी सगळे असतात. सोनाली वनराज आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला पण माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.