पुणे पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
पुणे : पुणे शहरात दिवसा तसेच रात्री घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना रात्रीच्या वेळी बंद फ्लॅट फोडणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मल्लिकार्जुन उर्फ मंजु साहेबराव पाटील (वय १९, रा. सुखसागरनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. टोळ्या पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे देखील चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाना या चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहेत. यादरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार प्रविण राजपुत व सुभाष आव्हाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी करणारा मंजु पाटील हा विश्रांतवाडीतील मुळा रोड परिसरात दुचाकी घेऊन उभा असून, तो कोणाची तरी वाट पाहत आहे. या माहितीनुसार पथकाने या परिसरात सापळा रचून पाटील याला पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकी व घरफोडीतील ऐवज असा एकूण दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : अमरावती हादरलं! भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्या, नेमकं काय घडलं?
भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास
पुणे शहरात चोऱ्या अन् घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांकडून धुमाकूळ घातला असल्याचे दिसत असून, कात्रजमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अभिजित विठ्ठल झाडे (वय २६, रा. वाघजाईमाता अपार्टमेंट, वाघजाईनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. झाडे सायंकाळी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.