सौजन्य - नवराष्ट्र टीम
अमरावती : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे पोलिसांसोबतचं नागरिकही हैराण झाले आहेत. अशातचं आता अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमधील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शोभानगर परिसरात एका युवकावर तिघांनी चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रोहित रतन पाल (१९, रा. मांडवा झोपडपट्टी) असे मृत युवकाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
रोहित पाल हा शोभा नगर परिसरातील एका पानटपरीनजीक सकाळी ११ वाजताच्या सुमारास मित्रासोबत बोलत उभा होता. त्याचवेळी तीन हल्लेखोर तेथे पोहचले. त्यांनी अचानकपणे रोहितवर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. या जीवघेण्या हल्ल्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर लगेच पळून गेले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. जुन्या वैमनस्यातून रोहितची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागात भरदिवसा घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास
जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला
पुण्यातही गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या काही दिवसाखाली पुण्यात वर्षभर कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेश गजसिंह हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. एक महिन्यापुर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान महेश व जखमी यांच्यात शाब्दीक वादावादी झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असता आरोपी त्याठिकाणी घातक हत्यारे घेऊन आले. अमित परदेशी याच्या डोक्यात तसेच हनुवटीवर वार करून गंभीर जखमी केले. तर, तक्रारदाराला उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश याच्यावर देखील आरोपींनी सपासप वार करून गंभीर जखमी केले. नंतर चौघांनी अजय पवार याच्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.