समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकूर; पुणे पोलीसांनी तरुणीला घेतले ताब्यात
पुणे : भारत व पाकीस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाही समाजमाध्यमांवर पाकीस्तान जिंदाबाद असा आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी कोंढव्यातील एका १९ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुभाष जरांडे यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तणाव परिस्थितीत समाज माध्यमात तेढ निर्माण करणारे, तसेच अफवा प्रसारित करणाऱ्या संदेशांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस कर्मचारी जरांडे हे पोलिस ठाण्यात हजर होते. त्यावेळी संबंधित तरुणीच्या समाजमाध्यमावर पाकिस्तान झिंदाबाद असा मजकूर प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिच्या या मजकुरामुळे समाजमाध्यमात तेढ निर्माण होऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर अटकेची कारवाई केली.
दरम्यान संबंधित तरुणीविरुद्ध येवलेवाडी परिसरात विविध संघटनेच्या वतीने काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुलीची सखोल चौकशी करून तिच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) कारवाई करावी, तरुणीवर यूएपीए व भारतीय न्यायसंहिता कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, कोंढवा परिसरात तातडीने कोंबिंग ऑपरेशन करावे, अशा मागण्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी केल्या.