टिपू पठाण टोळीतील फरार गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी हैदराबादमधून घेतले ताब्यात
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, पोलसदेखील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हडपसर भागातील टिपू पठाण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील मियापुर येथून बेड्या ठोकल्या आहेत. फैयाज गफार बागवान (२८, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ च्या समोर, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. बागवान याच्यावर काळेपडळ पोलिसांकडून मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असताना काळेपडळ पोलिस तसेच गुन्हे शाखेचे पोलिस त्याचा शोध घेत असताना पोलिस अमंलदार नासेर देशमुख आणि राहुल ढमढेरे यांना आरोपी हा हैद्राबाद येथील मियापुर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी युनिट ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक प्रमोद खरात, अमंलदार शहाजी काळे यांच्या पथकाने बागवान याला मियापूर येथून ताब्यात घेत अटक केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू
धनकवडीत वाहने फोडणाऱ्यांना अटक
पुण्यातील धनकवडीत वाहनांची तोडफोड करणार्या टोळक्याला सहकारनगर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. त्यात एक सराईत असून, तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मित्राला भेटायला आल्यानंतर दारुच्या नशेत टोळक्याने वाहने फोडल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. रोहीत कैलास आढाव (वय २१, रा.किरकीटवाडी), सुधीर बाप्पु सावंत (वय १९, रा.गोरावी वस्ती, नांदेड फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील आढाव रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी तिघा अल्पवयीन साथीदारांच्या साथीने वाहन-तोडफोड केली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार, सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
दोन वर्ष फरार झालेल्या गुंडाला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईनंतर फरार झालेल्या गुंडाला आंबेगाव पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली आहे. गेले दोन वर्ष गुंड पोलिसांना गुंगारा देत होता. नवाज निसार सय्यद (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ रा. मुसा चौक, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सय्यद याच्यासह साथीदारांवर पोलिसांनी २०२३ मध्ये ‘मकोका’ कारवाई केली होती.