पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या; पुणे पोलीसांचे मोठी कारवाई
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइत गुन्हेगाराला पोलिसांनी कर्वेनगर भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस निरीक्षक नीलेश बडाख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कुणाल सचिन घावरे (वय २८, रा. बराटे काॅलनी, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कर्वेनगर तसेच वारजे माळवाडी भागात गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. तेव्हा कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर घावरे थांबला आहे. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रतीक मोरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केली. नंतर पोलीस पथकाने या भागात सापळा लावून कुणाल याला पकडले. तर झडतीत त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घावरे याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पिस्तूल का बाळगले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.