पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सोने चोरीतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून पुण्यात सोने घेऊन आलेल्या नामांकित पेढीच्या शोरूमचे ६९ लाख रुपये किंमतीचे ७४० ग्रॅम सोन्याचे दागिने पुणे स्टेशन बाहेरून चोरण्यात आले होते. याप्रकरणात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने राजस्थानातून सराईत गुन्हेगाराच्या मूसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून २४९ ग्रॅम वजनाचे १८ लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
रूपसिंह गुलाबसिंह रावत (३१, देलरा, दिवेर तहसील, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ११ जून रोजी पुणे स्टेशनबाहेर ही घटना घडली होती. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी भरदिवसा मुंबईहून पुण्यात डिलिव्हरी देण्यासाठी पेढची गाडी आली होती. तेव्हा अज्ञातांनी तबल 70 लाख रुपयांचे सोने लुटले होते. याप्रकरणाचा समांतर गुन्हे शाखेच्या तपास युनिट दोनच्या पथकाकडून सुरू होता.
तपासादरम्यान राजस्थानातील देलरा गावातील रूपसिंग रावतने व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, संजय जाधव यांच्यासह पथक राजस्थानला रवाना झाले. पथकाने गुरूवारी (दि.२६) देवेरे भागातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी १८ लाख 66 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो पोलिसांच्या संशयाच्या यादीत होता. त्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू होता. मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. यादरम्यान तो दोन वेळा पोलिसांना हुलकावणी देऊन जागा बदलण्यात यशस्वी झाला होता. शेवटी मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर त्याला अटक केली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.