पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २० लाखांचे अमली पदार्थ जप्त
पुणे : ड्रग्जमुक्त सिटीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू असून, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर करडी नजर ठेवली जात आहे. सिंहगड रोड भागात अमली पदार्थ विक्रीस आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर,घाटकोपर, मुंबई), पियूष शरद इंगळे (वय २२, रा. स्पाईन रोड, चिखली,पिंपरी- चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. मोठ्या ड्रग्ज डिलरसह बाहेरून येणाऱ्या तस्करांवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोड भागात गस्त घालत होते. त्यावेळी नऱ्हे परिसरातील भुमकर चौकात तिघे जण अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मिश्रा, व्यास आणि इंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलीग्रॅम एल.एस.डी. असे अमली पदार्थ आढळून आले. अंशुल मिश्राने एका महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा साथीदार आर्श व्यास विमान कंपनीत कामाला (ग्राऊंड स्टाफ) होता. पियूष इंगळे याने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! कॉलेजमधील तरुणांमध्ये वाद; दोघांवर कोयत्याने सपासप वार
ओजीकुश गांजाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. गांज्याची लागवड बेकायदा आहे. काहीजण गांजाची लागवड शेतात किंवा दुर्गम भागात करतात. ओजीकुश गांजाची लागवड शेतात केली जात नाही. विविध रायासनिक पदार्थंचा वापर करुन ओजीकुंश गांजाची निर्मिती केली जाते.
मुंबईतून सराईत ड्रग डिलरला अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 6 ने गोवंडीच्या गौतम नगर परिसरातून फुरकान अन्सारी (28) या सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या 1,910 स्पास्मो प्रॉक्सीव्हॉन प्लस, नायट्राझेपाम, आणि क्लोनाझेपाम टॅब्लेट जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची बाजारातील किंमत 24,295 रुपये असून, आरोपीकडून 53,000 रुपये रोख आणि एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
फुरकान अन्सारीवर यापूर्वी चोरी, मारामारी, आणि अमली पदार्थ तस्करीचे 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच्याकडे नशेच्या गोळ्या कुठून आणल्या आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे.