संग्रहित फोटो
पुणे : सलग तिसऱ्या दिवशी शाळा तसेच महाविद्यालयीन तरुणांमधील वाद अन् त्यातून घडणाऱ्या खूनाच्या घटनांनी पुणे हादरले जात असून, मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाचा पुर्ववैमन्यासातून खून झालेला असताना भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेतात. दरम्यान दुपारच्या सुमारास जखमी तरुण आरोपी तरुणाच्या मैत्रिणीसोबत बोलत होता. यावेळी तरुणीने माझ्याविषयी अफवा पसरवतो का असे म्हणत झालेला प्रकार आपल्या आरोपी मित्राला सांगितला. नंतर आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले. हातात कोयते घेऊन या आरोपींनी जखमी तरुणाचा पाठलाग सुरू केला. महाविद्यालयाच्या पाठिमागील रस्त्यावरून मॉलसमोरून एरंडवण्याच्या दिशेपर्यंत आरोपींनी या तरुणांचा हातात कोयते घेऊन पाठलाग केला. भरदुपारी आणि गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
हे सुद्धाी वाचा : तरुणीला पोलीस भरतीचे आमिष दाखवले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
दरम्यान आरोपींनी जखमी तरुण आणि त्याच्या भावाला संजीवनी हॉस्पिटलजवळ गाठले आणि कोयत्याने वार केले. यात तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.