गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; 'या' टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार
पुणे/अक्षय फाटक : पुण्यातील टोळ्यांच्या ”डोळ्यांत” धडकी भरवणारी कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्याबरोबरच त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर आर्थिक ऑडिटची कात्री लावली आहे. आलिशान गाड्या, उंच उंच टॉवर, तर त्यामधील फ्लॅट्स आणि कोट्यवधींच्या मालमत्ता वैध स्रोतांशिवाय जमवलेली ही माया आता तपासणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. “गुन्हेगार जेरबंद होतीलच; पण त्यांच्या काळ्या पैशाचाही हिशेब घेतला जाईल” अशा ठाम भूमिकेतून पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमीने आश्वासक कारवाईचा एक विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील नव्याने उदयास आलेल्या टोळ्या तसेच प्रमुख टोळ्यांवर आणि त्यांच्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिस सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण, गुन्हेगारी काही नियत्रंणात येत नसल्याचे वास्तव आहे. बेफाम झालेल्या या गुन्हेगारांनी सर्व सामान्यांवर देखील धाक बसवत त्यांना किरकोळ कारणावरून मारहाण सुरू केली. मोक्का, एमपीडीए तसेच खून व खूनाचे प्रयत्न, दरोडा, खंडणी यासारख्या गुन्ह्यातून हे गुन्हेगार सहीसलामत जामीनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हेगारी जगतात आपला पाय रोवत असल्याचे वास्तव आहे.
आर्थिक पाठबळाच्या जिवावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या गुन्हेगारांना आर्थिक पाठबळ नेमक येते कुठून असा प्रश्न आहे ? इथपर्यंत लाखोंचा खर्च यांना झेपतोच कसा, असाही प्रश्न आहे, टोळ्यांच्या प्रमुखांकडून हा खर्च केला जातो. मग, त्यासाठी अवैध मार्गांचाही वापर होतो. त्यातूनच या टोळ्यांनी आपले साम्राज्य उभा केल्याची उदाहरणे पुण्यात आहेत. हे सूत्र, गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. खंडणी, मोठ-मोठ्या कंपन्यांचे स्क्रॅप उचलणे, तेथे कामगार पुरवणे, प्रोटेक्शन मनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून पुण्यातील टोळ्यांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. हेच गणीत आता पोलिसांकडून मोडीत काढले जाणार आहे. दोन वर्षांपुर्वी कोथरूडमध्ये झालेल्या गँगस्टरच्या खूनातील हे एक प्रमुख कारण समोर आले होते. औद्योगिक वसाहतीत या गँगस्टरने जम बसविला होता. राजकीय जवळीकता साधत काही कंपन्याची कामे घेतली होती. त्यातूनच मुळशीतील टोळ्यांत धुसफूस सुरू होती, अशी माहिती आहे.
काळ्या पैशांद्वारे गुन्ह्यांना प्रोत्साहन
गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आला. त्यातूनच मग टोळ्यांचे साम्राज्य उभे राहिले. टोळ्यांकडे ना कोणता वैध व्यवसाय, ना स्थिर उत्पन्नाचे साधन; तरीही त्यांच्याकडे आलिशान गाड्या, मोठमोठ्या बंगल्यांसह अनेक मालमत्ता, अशा संशयास्पद संपत्तीची माहिती आहे. तीच शोधण्यासाठी पोलिसांनी आता आर्थिक तपासणी यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.
साथीदार, नातेवाईक, विश्वासूंची छाननी
पोलिस ठाण्यांच्या माहितीनुसार टोळ्यांचे मुख्य सदस्यच नव्हे तर त्यांच्या साथीदार, नातेवाईक, विश्वासूंच्या नावावरील देखील मालमत्ता, गाड्या व बँक खात्यांचीही छाननी केली जाणार आहे. या ऑडिटचा उद्देश फक्त हिशेब मांडणे नाही, तर गुन्हेगारी टोळ्यांचा आर्थिक पुरवठा पूर्णपणे बंद करणे आहे. कारण पैसा हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. या संपत्तीच्या जोरावर ते नवे सदस्य जोडतात, शस्त्रे खरेदी करतात व राजकीय किंवा स्थानिक पातळीवर दबदबा निर्माण करतात. त्यामुळे पोलिसांनी मुळावरच घाव घालण्यास सुरूवात केली.
अवैध बांधकामे, मालमत्ता लक्ष्य
शहरातील अनेक गुंडानी दहशतीच्या जोरावर अवैध बांधकाम तसेच काही घरांचे कब्जे घेतल्याचे दिसून आले आहे. ह्याच अवैध गोष्टींवर पोलिसांनी आता पालिकेला सोबत घेऊन हातोडा मारहण्यास सुरूवात केली आहे. त्याचीही तपासणी सुरू असून, स्पष्टता येताच कारवाई केली जाणार आहे.
पुण्याच्या विभागाचे वाटप
पुणे शहरातील कुख्यात टोळ्यांकडून पुण्याचे वेगवेगळ्या टप्यात वाटप झाल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यातूनच त्यांची आप-आपसातली सेटलमेंट झाली असून पोलिसांना आपल्या भांडणातून फायदा होतो, आपणच मुर्ख ठरतो, असे या बैठकीत बोलल्याचे समजते. म्हणून काही टोळ्यांचे प्रमुख एका हॉटेलात देखील काही वर्षांपुर्वी स्नेह भोजनासाठी जमल्याची माहिती आहे. पुण्याचा भाग वाटप झाल्याने त्यातून भांडण होणार नाही आणि सर्वांनाच आर्थिक लाभ देखील हिशोबात मिळेल असा समज या टोळ्यांचा होता.
घरांचे ऑडिट, घरातील साहित्याचे ऑ़डिट, गाड्यांचे ऑडिट, ‘उजवा-डावा’ हात समजल्या जाणाऱ्या सदस्यांचीही माहिती घेतली जाणार आहे. या सर्वांचा हिशोब सोर्स ऑन इनकम नुसार दिल्यानंतर त्यांची सुटका होईल अन्यथा सर्व मालमत्ता सरकारी जमा केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आहेत प्रमुख टोळ्या…
१) बंडू आंदेकर
२) उमेश चव्हाण
३) निलेश घायवळ
४) गजानन मारणे
५) गणेश मारणे
६) शरद मोहोळ टोळी
७) महेश उर्फ बंटी पवार
८) अन्वर उर्फ नव्वा शेख
९) बापू नायर
१०) वसीम उर्फ खडा शेख
११) टिप्पू पठाण