गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांचा मोठा दणका; आता टोळीवर केली 'ही' मोठी कारवाई
पुणे : काही दिवसांपूर्वी (१७-१८ सप्टेंबर) मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती. या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील सदस्यांना अटक करुन मोठी कारवाई केली आहे. या टोेळीवर पुणे पोलिसांनी अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायदा (मोक्का) कारवाई केली आहे. निलेश घायवळचाही या गुन्ह्यात समावेश केला आहे.
कोथरूड भागात मध्यरात्री किरकोळ कारणावरून निलेश घायवळ टोळीच्या सहा जणांनी प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार केला होता. तर काही अंतरावरच वैभव साठे या तरुणावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले होते. टोळी युद्धातून झालेले खून आणि दुसरीकडे घायवळ टोळीच्या सदस्याकडून सर्व सामान्यांवर गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांत सहभागी आरोपींवर यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजवणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
प्राथमिक चौकशीत हल्ले नीलेश घायवळ टोळीच्या साखळी कारवायांचा भाग असल्याचे समोर आले. यानंतर पुणे पोलिसांनी सविस्तर तपास करून नीलेश घायवळ, मयूर कुंभरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादळेकर, मुसाब शेख, अक्षय गोगावले व जयेश वाघ यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संघटित स्वरूपात दहशत, नागरिकांना लक्ष्य करणे आणि शस्त्रांचा खुलेआम वापर यामुळे ही कारवाई झाली.
कोण आहे निलेश घायवळ?
पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात वचक निर्माण करण्यासाठी निलेश घायवळ गँग सक्रिय आहे. गजा मारणे आणि निलेश घायवळ टोळीत अनेक दिवसांपासून वैर आहे. एकमेकांचा बदला घेण्यासाठी गुन्हे सातत्याने घडत असतात. निलेश घायवळ टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2000 ते 2003 या काळात घायवळची भेट गजानन मारणे याच्याशी झाली. दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि सात वर्षांची शिक्षा भोगली. जेलमधून सुटल्यानंतर घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामुळे दोघांमध्ये वैराचे नाते तयार झाले.