
१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
पुणे : गेल्या ३० वर्षांपासून पुण्यासह, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगरसह अन्य ठिकाणी १०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या आणि दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने डोणजे फाटा परिसरातून अटक केली आहे. राजु बाबुराव जावळकर (वय ६०, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०८, डोणजे फाटा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना ८ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राजु जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कायगुडे यांनी ही माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना दिली. त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार युनिट दोनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी डोणजे परिसरात सापळा रचून जावळकर याला शिताफीने ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
जावळकर याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४८/२०२४ दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर पाहिजे आरोपी होता. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, जावळकर हा अभिलेखावरील वाहनचोरी करणारा गुन्हेगार असून, गेल्या तीन दशकांत त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी १०० पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण भागाबरोबरच सातारा, अहिल्यानगर तसेच इतर ठिकाणीही त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.