सुरक्षारक्षकच निघाला चोर, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
पुणे : राज्यासह देशभरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर दररोज डल्ला मारत आहॆेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी प्रकाश मरगजे व त्यांच्या पथकाने केली आहे.
सोनी हा सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. ८ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे बाहेरगावी गेले होते. सोसायटीतील सोनीने तक्रारदाराच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले होते. १२ ऑगस्ट रोजी ते गावाहून परतले. तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारदाराने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चोरट्याने बेडरूममधील कपाटातून १० तोळे सोन्याचे दागिने लांबविले होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले. सोसायटीत घरकाम करणारे, रहिवाशी, तसेच सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सोनी याला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. सोनी याच्याकडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
सराफाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते सराफ व्यवसायिकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून काळेपडळ, चंदनगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तर तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपय किंमतीचे मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहीत संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, रा.दोघे वडगावबुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. तर त्यांना बनाट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.